Wednesday, June 6, 2012

डॉ. अभय बंग यांचा शरद पवारांना उपरोधिक सल्ला


डॉ. अभय बंग यांचा शरद पवारांना उपरोधिक सल्लाBookmark and SharePrintE-mail
राज्यात प्रतिदिन प्रतिमाणसी दारूची एक बाटली द्या!
अमरावती, २६ डिसेंबर / प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला दररोज एक बाटली दारू देण्याचे धोरण आखा, असा उपरोधिक सल्ला ज्येष्ठ समाजसेवक आणि दारूबंदीचे कट्टर पुरस्कर्ते डॉ. अभय बंग यांनी दिला आहे.
अमरावती जिह्य़ात दारूबंदी करावी आणि गुरुकुंज मोझरी येथील दारू कारखाना बंद करावा, या मागणीसंदर्भात विविध संघटनांनी आज येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सभागृहात एक बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. अभय बंग यांनी दारूविरोधी लढय़ाविषयी विस्तृत भूमिका मांडली.
कृषी मंत्री शरद पवार दिल्लीत असताना देशात अन्नधान्याची कमतरता आहे, असे कबूल करतात आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना दारूची कमतरता दिसते. देशातच नव्हे तर जगात अन्नधान्याचा तुटवडा असताना अन्नधान्यापासून दारू निर्मितीला समर्थन देण्याची शरद पवारांची भूमिका ही विरोधाभास निर्माण करणारी आहे. महाराष्ट्रात दररोज ३ कोटी दारूच्या बाटल्या खपतात, हे मद्यराष्ट्र नव्हे तर काय आहे, असा सवाल करत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
शरद पवार यांनी अन्नधान्यापासून दारूनिर्मितीला विरोध करणारे महाराष्ट्राला बदनाम करत आहेत, असे वक्तव्य केले पण, त्यांनी वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्रासमोर दारूची कमतरता ही समस्या आहे का? याचा विचार करावा लागेल. शरद पवारांनी तसेच रोगनिदान केलेले दिसते. दिल्लीत असताना ते अन्नधान्याच्या व्यवस्थित पुरवठय़ाची जबाबदारी राज्यांवर ढकलतात आणि महाराष्ट्रात आल्यानंतर अन्नधान्यापासून दारू निर्मितीचे समर्थन करतात हा विरोधाभास आहे. आज महाराष्ट्रासमोर अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत. कुपोषणामुळे हजारो बालमृत्यू होतात पण, त्यासाठी काही करण्याची सरकारची तयारी नाही. जगातील एक अब्ज लोकांना पुरेसे अन्न खायला मिळत नाही हे एका अहवालातून उघड झाले आहे, असे डॉ. अभय बंग म्हणाले.
अन्नधान्यापासून दारू निर्मितीसाठी ३६ नव्या कारखान्यांना मंजुरी देण्यात आली. हे सर्व कारखाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या मुलांना वाटून देण्यात आले आहेत. विरोधी पक्षांनी तोंड उघडू नये, अशी खेळी सरकारने खेळली. ही अत्यंत लाजीरवानी बाब आहे, असे डॉ. अभय बंग म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी दारू हेही एक कारण आहे, ते महत्त्वाचे कारण जरी नसले तरी पण, आत्महत्येला हातभार लावणारे ते एक कारण आहे. आता प्रत्यक्ष महसूल मंत्र्यांनीच हे मत मांडले आहे. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांना २५ कोटी रुपये एवढा वार्षिक महसूल दारूच्या विक्रीतून मिळत होता, महात्मा गांधींनी दारूच्या विरोधात आंदोलनात्मक भूमिकाही घेतली होती. महाराष्ट्रात १९६३ मध्ये दारूबंदी अंशत: शिथिल करण्यात आली होती. १९९२-९३ मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात दारू विक्रीपासून ३०० कोटींचा महसूल मिळाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या वर्षी दारू विक्रीच्या करातून राज्याला ४ हजार २०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आणि या वर्षांत ५ हजार कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे मद्यराष्ट्र नव्हे तर काय आहे, असे डॉ. अभय बंग म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात दररोज ६० लाख लिटर्स दारूची विक्री होते. म्हणजे ३ कोटी दारूच्या बाटल्या खपतात, महाराष्ट्रात पुरूषांची लोकसंख्या देखील तेवढीच आहे. आता प्रत्येक माणसाच्या हाती दररोज एक दारूची बाटली देण्याचे धोरण सरकारने आखले आहे, अशी टीका त्यांनी केली.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=35043:2009-12-26-19-12-55&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2

No comments:

Post a Comment