Wednesday, June 6, 2012

डॉ. अभय बंग - Global Marathi


डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्यासारखे ‘फॉरेन रिटर्न डॉक्टर गडचिरोलीसारख्या मागास भागात जाऊन काम सुरू करतात. एवढंच नाही तर, आज एकूण आरोग्यक्षेत्राचा विचार करायचा असेल तर ही दोन नावं ठळकपणे समोर येतात. त्यांना टाळून पुढे जाता येत नाही, एवढं महत्त्वाचं काम त्यांच्या हातून घडलेलं आहे. अनेकांना दिशा दाखवणारं असं हे काम आहे. आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल्सना त्यांच्या संशोधनांमधून निघालेल्या निष्कर्षांची वारंवार दखल घ्यायला लागली आहे.

डॉ. अभय बंग हे वर्ध्यात गांधीवादी कुटुंबात वाढलेले आहेत. नई तालीम पद्धतीत त्यांचे शिक्षण झालेलं आहे. घरातून सामाजिक कामाचा वारसा त्यांना मिळालेला आहे. डॉ. अभय यांनी फिजिओलॉजी या विषयाचं शिक्षण घेतलं आहे. ते आपल्या विषयात पहिले आले होते.

अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापिठातून ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ’ या विषयावरची पदवी त्यांनी १९८४ साली सुवर्णपदकासह मिळवली. अत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटसमध्ये त्यांना संधी चालून आल्या होत्या. पण शहरी, श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि गडचिरोलीला आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडलं. त्यांच्या या निर्णयाला त्यांची पत्नी राणी बंग यांनीही चांगलीच साथ दिली. त्यानीही स्त्रीरोगाचं शिक्षण घेतलं होतं.

ह्या दोघांनी निवडलेलं हे कार्यक्षेत्र हे असं होतं, सर्वच बाबतीत मागास. इथे येऊन यांनी 'शोधग्राम' उर्फ 'सर्च' ची स्थापना केली. 'सर्च'म्हणजे "Society For Education, Action And Research In Community Health". ज्या प्रमुख उद्देशाने हे नाव संस्थेला ठेवण्यात आलं, तोच उद्देश आजही कायम आहे. आजही एज्युकेशन,एक्शन,आणि रिसर्च या क्षेत्रात अत्यंत मूलभूत आणि तितकंच व्यापक स्वरूपाचं काम इथे चालतं. या तीनही गोष्टी हातात हात घालून चालतात.

त्यांच्या कामाचे स्वरूप लोकांमध्ये जायचे, त्यांच्यामध्ये राहायचे, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचं ऐकून, त्यांच्यापासून शिकून , त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करायचा व त्यातूनच नवनिर्माण करायचे. या भुमिकेतून काम केले तर ते परिणामकारक तर ठरतच, शिवाय टिकाऊही होतं. असे त्यांचे म्हणणे होते. लोकांचं पारंपरिक ज्ञान आणि वैद्यकीय संशोधन यांची सांगड घालावी म्हणजे ते लोकांना पटते.

सर्चमध्ये पूर्वीपासून अशिक्षित स्त्रियांनाच आरोग्यसेवेचा किमान प्रशिक्षण देण्यात यायचं. दाई आणि आरोग्यदूत यांच्यामार्फत आदिवासी स्त्रियांना उपचार देण्याचा प्रकल्प सर्च मध्ये सुरुवातीपासून राबवण्यात येत होता.

डॉ. अभय आणि राणी बंग यांचं काम एखाद्या रुग्णालयापुरतं सीमित न राहता, खेड्यापाड्यांत, देशा-परदेशात उपयुक्त ठरतंय, यातच या कामाचं यश आहे.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शिक्षण, संशोधन आणि कृती या तीनही गोष्टींवर 'सर्च' चा भर आहे. त्यातूनच 'सर्च' च्या आवारात एक संशोधन केंद्र उभं राहिलं आहे. देश-परदेशातली आरोग्यविषयक पुस्तकं, महत्त्वाची संशोधनं, सीडीज् अशा आवश्यक माहितीचा संग्रह तिथे करून ठेवला आहे. आरोग्यविषयक कामांचं संशोधन करू इच्छिणार्‍यांसाठी हे संशोधन केंद्र म्हणजे जणू पंढरीच आहे. देश-परदेशातून अनेक विद्यार्थी, इंटर्न्स इथे अभ्यासासाठी, संशोधनासाठी, नवं ज्ञान जाणून घेण्यासाठी, प्रत्यक्ष कार्यक्रम प्रकल्प बघण्यासाठी येत असतात.

आदिवासींच्या आरोग्यसुधार कार्यक्रमांबरोबरच त्यांचं जीवनमान सुधारणं हेही डॉ. बंग पतिपत्नीचं एक लक्ष्य राहिलं आहे. या गावात ज्या प्रकारची शेती होते, त्यात बदल घडवून आणणं, शेतीत नवनवे प्रयोग करून शेतीतून फायदा मिळवत मातीचा कस जपणं, यासाठी शेतकर्‍यांना माहिती दिली जाते. प्रोत्साहित केले जाते. गावाचा असा एक ग्रामकोष तयार करून बँक आणि बचतीचे काही मार्गही सुरू केले आहेत. यातून तिथल्या पारंपरिक माणसाला आत्मविश्‍वासाने उभं राहता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

१९८५ पासून कार्यरत असलेल्या या 'सर्च' कडे सार्‍या जगाचं लक्ष आहे. महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च आणि मानाचा समजला जाणारा ‘महाराष्ट्रभूषण’ हा पुरस्कार डॉ. अभय बंग यांना मिळाला आहे. तसेच ‘स्पिरिट ऑफ मस्टॅक’, ‘बिल-मेलिंदा गेटस’ असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. 'द वीक' ने ही 'द कपल ऑफ द इयर - १९९६' असा त्यांचा गौरव केला होता.

त्यांचं पुस्तक 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' - यात स्वतःला म्हणजे एक डॉक्टरला हृदयरोग जडला, याची कारणं काय असावीत हे जाणून त्यातून त्यांच्या चुकीच्या सवयी त्यांनी मांडल्या आहेत. स्वतःचं केलेलं आत्मचिंतन म्हणजे हे पुस्तक. हे पुस्तक लोकांना त्यांच्यापुढे आरसा धरल्याप्रमाणे वाटतं. व डॉक्टरही चुकू शकतात हे दाखवून मी तुमच्यातलाच एक हे दाखवून दिले आहे.

अशा प्रकारे असामान्य व्यक्तिमत्त्व असलेले अभय बंग यांचे कार्य वर्णन करण्यास शब्दच कमी पडतात.

No comments:

Post a Comment