Wednesday, June 6, 2012

भारतीयांच्या स्वप्नांची अमेरिकेलाही धास्ती - डॉ. अभय बंग


भारतीयांच्या स्वप्नांची अमेरिकेलाही धास्ती - डॉ. अभय बंग

 
Source: प्रतिनिधी   |   Last Updated 10:42(26/03/12)
 
 
 
नगर - देशातील आजचा युवा वर्ग बदलला असून त्याला उद्याची भ्रांत नाही, त्याच्याकडे मोठी स्वप्ने आहेत. त्यामुळे अमेरिकेसारखा देशही भारतातील तरुणाईला घाबरत आहे, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी रविवारी सांगितले. जैन सोशल फेडरेशनच्या वतीने धार्मिक परीक्षा बोर्डात आयोजित महावीर व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

डॉ. बंग म्हणाले, तीन-चार दशकांपूर्वी देशातील तरुणांपुढे नोकरी आणि करिअरचा प्रश्न होता. शिक्षण संपवून एकदाची नोकरी मिळाली की जीवन धन्य झाले, अशी मानसिकता त्यावेळच्या तरुणांची होती. मात्र, आताचा तरुण बदलला आहे. मोबाइल, लॅपटॉप, कार यासारख्या सर्व सुविधा त्याच्याकडे आहेत. बंधने नसल्याने त्याला उद्याची कोणतीही भ्रांत नाही. त्यामुळे उरी बाळगलेल्या मोठ्या स्वप्नांच्या मागे तो धावत आहे. भारतीय तरुणांच्या या मोठ्या स्वप्नांना जगातला बलाढ्य देश अमेरिकादेखील घाबरतो आहे.

आई-वडिलांच्या पुण्याईने दान स्वरूपात मिळालेल्या या ‘जीवनाचे काय करू?’ आणि ‘जीवनाचे पर्याय काय?’असे प्रश्न यावेळी डॉ. बंग यांनी उपस्थितांना विचारले. नोकरी व करिअर झाल्यावर जीवनाचा दुसरा अध्याय सुरू होतो. त्यामुळे हरिश्चंद्र बनायचे की, शिक्षण पूर्ण करून गुलामांच्या बाजारात स्वत: विक्रीला काढायचे याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बंग यांचे विचार ऐकण्यासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती.

नगर महापुरुषांचा जिल्हा - डॉ. बंग यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीलाच नगर हा समाजसेवकांचा व महापुरुषांचा जिल्हा असल्याचे सांगितले. रावसाहेब पटवर्धन, बाळासाहेब भारदे, नवनीतभाई बार्शीकर, डॉ. कुमार सप्तर्षी, अण्णा हजारे, पोपटराव पवार यासारख्या महापुरुषांच्या जिल्ह्यात येऊन बोलण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच असल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment