| तरुणांनी ध्येय ठरवून स्वत:ला, देशाला तारावे -अभय बंग |
प्रतिनिधी
तरुणांनी क्षणिक सुखाच्या मागे न लागता जीवनाचे ध्येय ठरवून स्वत:ला व देशाला तारले पाहिजे, असा उपदेश सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी दिला. सी.पी. अॅण्ड बेरार शिक्षण संस्थेतर्फे आयोजित केलेल्या अण्णासाहेब गोखले व बापूसाहेब कागभट स्मृती व्याख्यानमालेचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. भाषणाचा विषय होता ‘या जीवनाचं काय करू?’ अध्यक्षस्थानी सी.पी. अॅण्ड बेरार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब महाजन होते तर सचिव अधिवक्ता अशोक बन्सोड यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बंग म्हणाले, तरुण म्हणजे तारणारे. त्यांच्या बळावरच देश बलशाली ठरणार आहे. आपण आयुष्यात पाहिलेल्या सर्वात अगतिक, हतबल माणसासाठी जर काही करू शकत असू तर त्याच्या हिताबरोबर आपलेही हित झाल्याशिवाय राहणार नाही. समाजाशिवाय माणसाला अस्तित्व प्राप्त होऊ शकत नाही म्हणून मीपणा सोडून समाजहिताचा विचार केला पाहिजे. प्राचार्य मिलिंद बारहाते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविक अशोक बन्सोड यांनी केले. संचालन डॉ. राजेंद नाईकवाडे यांनी केले. अजय कुळकर्णी यांनी आभार मानले. |
No comments:
Post a Comment