सेवाग्राम ते शोधग्राम – डॉ. अभय बंग
Posted: ऑगस्ट 4, 2009 in सामाजिकTags: अभय बंग, गडचिरोली, निर्माण, शोधग्राम, सर्च
शब्दांकन - दीपा देशमुख
“महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे’ असं गांधीजी म्हणत असत. गेल्या काही वर्षांत मात्र सामाजिक कार्यकर्त्यांची ही परंपरा उतरणीला लागली आहे. त्यावर उपाय म्हणून “सर्च’ आणि “एमकेसीएल’ या दोन संस्थांनी मिळून “निर्माण’ या नावाने एक अभिनव प्रकल्प सुरू केला आहे. समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसमवेत इथे अनेक प्रयोग केले जातात.
“निर्माण’च्या एका शिबिरामध्ये मुलांशी हितगुज करताना डॉ. अभय बंग यांनी आपल्या सामाजिक जीवनाचा पटच त्यांच्यापुढे उलगडला.
त्याचं हे शब्दांकन.
—————————————————————————————–
महात्मा गांधींच्या विचारसरणीचा परिणाम माझ्यावर माझ्या जन्माच्या आधीपासूनच झाला, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. माझे वडील अर्थशास्त्राचे प्राध्यापक. नागपूरला गांधींजींनी सुरू केलेल्या राष्ट्रीय कॉलेजात ते अर्थशास्त्र शिकवत. ते गोल्ड मेडलिस्ट होते. 1946चे दिवस होते. भारताला स्वातंत्र्य मिळेल, हे जवळजवळ स्पष्ट झालं होतं. वडिलांना अर्थशास्त्रात अजून बरंच काही शिकायचं होतं. त्यांना अमेरिकेची फेलोशिपही मिळाली होती. अमेरिकेत जाण्यापूर्वी एक आठवडा अगोदर वडिल म. गांधींना भेटायला सेवाग्राममध्ये दाखल झाले. भेटीसाठी दोन मिनिटांचा अवधी मिळाला होता. वडिलांनी आपण अर्थशास्त्र शिकायला अमेरिकेत जातो आहोत असं सांगितलं, तेव्हा बापू म्हणाले, “”अर्थशास्त्र शिकायचं असेल तर अमेरिकेत कशाला, ते भारतातल्या कुठल्याही खेड्यात जाऊन शिकता येईल.” वडील आश्रमाच्या बाहेर आले आणि त्यांनी आपलं तिकीट तिथंच शांतपणे फाडून टाकलं.
या सेवाग्राममध्ये माझं लहानपण गेलं. त्या वेळी सेवाग्राममध्ये फार महान माणसं होती. मनोहर दिवाण हा असाच एक ध्येयवेडा तरुण होता. त्या वेळी कुष्ठरोगावर फक्त मिशनरीच काम करत. मात्र, गांधींजींच्या एका वाक्यावर या तरुणानं 60 वर्षं कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचं व्रत अंगिकारलं. वर्ध्याजवळच्या दत्तपूरमध्ये कुष्ठरोग्यांसाठी काम करणारा हा पहिला भारतीय हिंदू माणूस! गोपाळ वाळुंजकर हाही असाच गोल्ड मेडलिस्ट. गांधीजींना “मी काय करू’ असं विचारायला आला, तेव्हा त्यांनी सांगितलं, “”जा, मेलेली गुरं फाड आणि चर्मकारांना शिकव कशा चांगल्या चपला बनवायच्या!” या तरुणानं बापूंचा शब्द प्रमाण मानून आयुष्यभर हेच केलं. चर्मशास्त्र विकसित केलं. त्याचप्रमाणं आप्पसाहेब पटवर्धन हाही गोल्ड मेडलिस्ट तरुण, ज्याला पुढं “कोकणचे गांधी’ म्हणून ओळखलं गेलं. गांधीजींनी या ब्राह्मण तरुणाला सांगितलं, “”सफाईकाम करण्यासाठी आपण जी एक जात निर्माण केलीय, तिला करावं लागणारं काम हे भारतीय समाजावरचं लांछन आहे. जा, तिथं काम कर.” आणि या तरुणानं आयुष्यभर हेच काम केलं. जेलमध्ये गेल्यावरसुद्धा या माणसानं “मला “क’ वर्गाची व्यवस्था द्यावी’ अशी विनंती केली. तसंच जेलमध्येसुद्धा जेलच्या सफाईचं काम द्यावं, ही मागणी केली. अशी माणसं आणि अशी त्यांची ध्येयनिष्ठा.
गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वात नेमकी काय जादू होती? त्यांचं आयुष्य एक मिशन मानायला हवं. जो अंतिम माणूस आहे, शेवटचा माणूस, त्याची समस्या घ्यायची, असं विलक्षण आव्हान त्यांनी स्वीकारलं होतं. राम मनोहर लोहिया फायर ब्रॅंड वक्ते म्हणून त्या वेळी ओळखले जात. मात्र डॉ. लोहिया, नेताजी सुभाषबाबू, पंडित नेहरू असे सारेच नेते गांधीजींना भेटत आणि म्हणत, आम्ही इतक्या तयारीनं बोलतो, पण त्याचा इतका प्रभाव पडत नाही. मात्र तुम्ही काय बोलता हे लोकांना धड कळतही नसावं, तरीही कोट्यवधी माणसं तुमचं ऐकतात, हे कसं? त्या वेळी गांधीजी म्हणत, “”मी जे जगलो नाही ते मी लोकांना सांगितलं नाही.”
द. आफ्रिकेपासून गांधीजींनी संडास साफ करण्याचं काम स्वत: केलं. चपला बनवायचंही ते शिकले. म्हणूनच गोपाळ वाळुंजकर असो वा अप्पासाहेब पटवर्धन, या माणसांना त्यांनी तेच सांगितलं जे त्यांनी स्वत: केलं होतं. म्हणूनच त्यांच्या “नई तालीम’ पद्धतीचं शिक्षण म्हणजे जगण्यातून शिक्षण आहे. उदा. मूल कसं चालतं? प्रेम कसं केलं जातं?
माझ्या आयुष्याचं मिशन हे वयाच्या 13व्या वर्षीच ठरलं. मी आणि माझा भाऊ अशोक, जो तीन वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा, एक दिवस पिंपरी गावी सायकलनं जात होतो. टेकडीच्या पायथ्याशी तो मला म्हणाला, “”अभय, आपण आता मोठे झालोत. आपण जीवनात काय करायचं ते ठरवून टाकू.” आम्ही पाचच मिनिटांत ठरवलं. प्रश्र्न समोर होतेच. अशोकनं कृषी शिकायचं आणि मी डॉक्टर व्हायचं. शिकून याच देशात राहून काम करायचं. अशोक आजही कोरडवाहू शेतीवर प्रयोग करतोय.
मी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झालो. कॉलेजमध्ये पहिल्याच दिवशी डिसेक्शन हॉलमध्ये माझा टेबल पार्टनर चंद्रपूरचा होता. त्यानं दूरच्या टेबलावरची एक मुलगी दाखवली. तो म्हणाला, “”ती मुलगी नीट बघून ठेव. ती स्कॉलर आहे. तुझी तिच्याशी स्पर्धा आहे. ती कायम पहिली आली आहे.” ती मुलगी होती राणी! राणी ही एक विलक्षण मुलगी होती. अत्यंत नामांकित श्रीमंत घराण्यातली मुलगी असूनही अतिशय साधेपणाची स्वप्न असलेली ही मुलगी पुढं माझी जोडीदार बनली.
1977चा काळ असेल. आम्ही मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडल्यावर ठरवलं होतं, की वर्धा जिल्ह्यातून आपल्या कामाची सुरुवात करायची. ही व्यवस्था बदलवण्याची स्वप्नं उराशी घेऊन आम्ही निघालो होतो. आपल्यासारखी, आपल्या विचारांची अनेक माणसं भेटतील आणि आपलं स्वप्नही पुरं होईल. आयुष्यभर झोकून देत काम करायचं, आणि या झोकून देण्यात एक विलक्षण आनंद असतो. 1978 साली वर्धा येथे मी आणि राणीनं कामाला सुरुवात केली. “चेतना विकास’ नावाची संस्था होती. वर्ध्याहून जवळच कान्हापूर नावाचं 700 लोकसंख्या असलेलं गाव आम्ही निवडलं. तिथं आरोग्याचं काम करण्यासाठी क्लिनिक उघडलं. तीन वर्षं हे क्लिनिक चालवलं.
ही आरोग्यसेवा आम्ही अगदी किरकोळ म्हणजे 25 पैसे शुल्क घेऊन दिली. आवश्यकता असेल तरच इंजेक्शन द्यायचं, अन्यथा नाही, हेही आम्ही ठरवलं होतं. मात्र यातून अनेक गमतीजमती घडत होत्या. गावातल्या लोकांचा समज वेगळाच होत होता. इंजेक्शन देत नाही तो डॉक्टर कसला? आम्हाला इंजेक्शन देता येतच नसावं, असंही त्यांना वाटत होतं. त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. या गावात अजाबराव ईवनाते नावाचा एक आदिवासी होता. तो शेतमालकाकडे काम करत असे. काम करताना मशिनमध्ये त्याच्या हाताचा चेंदामेंदा झाला. हात कापावा लागला. हा अन्याय स्वीकारायचा? करायचं काय? कदाचित हे चित्र संघर्षात्मक कार्यातून बदलेल असं आम्हाला वाटलं. त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन गावबैठक बोलावली.
अजाबरावला न्याय मिळवून द्यावा, गावकऱ्यांच्या लक्षात परिस्थिती आणून द्यावी आणि शेतमालकानं आपली नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि अजाबरावाला नुकसानभरपाई द्यावी, असा आमचा उद्देश होता. या गावबैठकीला फक्त तीन जण उपस्थित होते. एक अजाबराव स्वत: आणि त्याचे दोन दारूडे मित्र! गावकरी आले नाहीत, तरीही आम्ही धीर सोडला नाही. त्यांनी त्यांच्या घरातूनच ऐकावं, या तयारीनं आम्ही लाऊडस्पीकरवरनं बोलत राहिलो. यावरचा गावकऱ्यांचा प्रतिसाद फारच चमत्कारिक होता. अजाबरावविषयी पोटतिडकीनं बोलत असतानाच आम्ही रुग्णसेवा दिली त्या घराघरांतून आमच्यावर दगडफेक सुरू झाली. आम्ही जीव वाचवून कसेबसे परतलो.
हा अपमान खूप जिव्हारी लागला होता. पुरते 15 दिवस आम्ही गावात गेलोच नाही. गावकऱ्यांनी आम्हाला ही वागणूक का दिली, हा प्रश्र्न मनाला अस्वस्थ करीत होताच. त्यांनी असं का केलं याचं जे उत्तर मिळालं ते सुन्न करणारं होतं. त्यांचं म्हणणं होतं, तुम्ही रुग्णसेवा करायला आलात ती करा. पण तुम्ही आम्हाला फसवलंत. तुम्ही खरंतर, नेतागिरी करायला आला होतात! त्याचबरोबर, ज्या शेतकऱ्यानं नुकसानभरपाई द्यावी असं आम्ही म्हणत होतो तो 50-60 एकर जमिनीचा मालक असूनही त्याची परिस्थिती अतिशय वाईट होती. ही जमीन संपत्ती नसून एक ओझं होतं. आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय होती. तो स्वत:च्या कुटुंबाचंही पोट भरू शकत नव्हता, गावकऱ्यांची सहानुभूती त्याच्याबद्दल तितकीच होती. आम्हाला या घटनेतून कळलं, की रुग्णसेवा देऊन प्रश्र्न सोडवता येत नाहीत.
1970-80 या दहा वर्षांत आम्ही अनेक सामाजिक संघटनांना भेटलो. आम्ही गरिबांना संघटित करायचं ठरवलं. 40 गावांचं संघटन केलं. रोजगार हमी योजनेसाठी आम्ही सरकारविरुद्ध न्यायासाठी लढायला सज्ज झालो होतो. आम्ही अनेक मोर्चे काढायचो. सातत्यानं कलेक्टरला भेटायचो. पण मजुरांची मजुरी 3 रुपयांवरून 4 रुपये वाढली, इतकाच काय तो फरक पडला. आम्हाला लक्षात आलं, की हेही काही खरं नाही.
या सगळ्याचं उत्तर शोधताना एकदा वि. स. पागे आमच्या घरी आले. मी क्रांतीच्या धुंदीत होतो. प्रत्येक माणसाला किती कॅलरीजची आवश्यकता असते इथपासून अनेक पैलूंवर मी अभ्यास करत होतो. पागे समितीनं केलेल्या अहवालाची मूळ प्रत मिळवली. त्यांनी ही मजुरी ठरवताना कशा प्रकारे गणितं केलीत, हेही अभ्यासलंं. किमान 12 रुपये मजुरी असायला हवी जिथं ती 4 रुपये मिळत होती. एक छोटासा निबंध काही वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाला. या सगळ्या प्रयत्नांचं फलित म्हणजे महाराष्ट्रातल्या 60 लक्ष मजुरांची मजुरी 4 रुपयांवरून 12 रुपये झाली. हा वेगळाच अनुभव होता. संघटना, मोर्चे काढून जे झालं नाही ते एका तीन महिन्यांच्या संशोधनाने साध्य झालं. आमच्या हेही लक्षात आलं, की निव्वळ सेवेनं समाज बदलत नाही, तर त्यामागं बौद्धिक कुवत, ज्ञानाची जोड देण्याचीही गरज असते.
हे सर्व चालू असताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली, की रोगाचं मूळ आपल्या देशात, मात्र संशोधनं होतात बाहेरील देशात. उदा. क्षयावरील संशोधन केलं जर्मनीच्या रॉबर्ट कॉकने. माझ्या देशात जो रोग पसरतो त्या वेळी माझे डॉक्टर्स काय करतात, हा प्रश्र्न मला भेडसावू लागला. माझ्या देशातील आयुर्वेदाची पद्धती प्राचीन, मात्र तिच्यातही कोणी पुढं संशोधन केलं नाही. दु:खद वास्तव असं, की इथले डॉक्टर्स जे संशोधन करत होते ते अमेरिकेत होणाऱ्या रोगांवर. राणीनं आणि मी ठरवलं, आपण आता संशोधनाची पद्धत शिकायची. त्यासाठी अमेरिकेला जाणं आवश्यक होतं. आम्ही अमेरिकेत एक वर्षासाठी (1984 साली) गेलो. आमचे गुरू होते कार्ल टेलर. परत येताना आम्ही पुस्तकं, स्लाइड प्रोजेक्टर घेऊन परतलो. भारतात आल्यावर कुठं काम करायचं, हा प्रश्र्न होता. संशोधन करायला खूप सुविधांची गरज असते. या सुविधांची पूर्तता शहरात होऊ शकते. शहरात जावं की जाऊ नये, या द्विधा अवस्थेत असताना म. गांधींचं वाक्य आठवलं, “भारत के देहातोंमें जाओ।’
आमचा मुलगा आनंद चार वर्षांचा होता. त्याला गोष्ट सांगताना आम्हालाही आमच्या प्रश्र्नाचं उत्तर मिळालं. अकबर-बिरबलाची प्रसिद्ध गोष्ट होती ती. अकबराच्या आदेशानुसार बिरबलाला दहा मूर्खांचा शोध घ्यायचा होता. अंगठी जंगलात नदीच्या पलीकडे हरवलेली असताना एक मूर्ख ती जिथं दिव्याचा उजेड आहे तिथं शोधत होता. बिरबलाला दहावा मूर्ख शिरोमणी सापडला आणि आम्हाला आमच्या प्रश्र्नाचं उत्तर! आमचे प्रश्र्न खेड्यात होते आणि आम्ही उत्तर शहरात शोधायच्या विचारात होतो. 1985 साली आम्ही गडचिरोली बघायला गेलो आणि 1986 साली तयारीनिशी गडचिरोलीत पोहोचलो. सेवाग्रामपासून सुरू झालेली ही कथा शोधग्रामच्या टप्प्यावर येऊन पोहोचत होती.
मध्यपूर्वेला छत्तीसगड, दक्षिण तेलंगणा (आदिवासींचा मागासलेला भाग), आंध्र प्रदेशाची सीमा, 60% जमीन जवळजवळ जंगलानं व्यापलेली, मोठमोठे तलाव. डोंगराच्या माथ्यावर टिप्पा नावाचा तलाव. गडचिरोली जिल्ह्याची 40% लोकसंख्या माडिया गोंड होती. बस्तर-गडचिरोलीत देवीच्या मूर्ती गावाबाहेर होत्या. गावात आरोग्यसेवा नसल्यामुळे त्यांनी बहुधा या देवी निर्माण केल्या असाव्यात. या लोकांची उपजीविका जंगलातून मोहाची फुलं गोळा करणं, वाळवणं, खाणं आणि दारू बनवून पिणं यावर होत होती. मुख्य पीक धानाचं होतं. 60% लोक जे गैरआदिवासी होते ते शेती करत होते. मोळ्या करून शहरात विकणं, असं काहीबाही करायचे. काही तर गवताच्या बियांवर जगणारी कुटुंबं होती. रस्त्यांची स्थिती अतिशय वाईट. कठाणी नदीचा 20-25 वर्षांपासून खचलेला पूल… पूर आला की अनेक गावांशी संपर्क तुटलाच म्हणून समजा. 1986 साली असाच प्रचंड पूर आला. 7 दिवस पाण्यात अडकलो…
अशा या गडचिरोलीत एका गोडाऊनच्या जागेत “सर्च’ची स्थापना झाली. सर्चचा लोगो म्हणजे एका अंधारलेल्या जंगलातली पाऊलवाट- एक शोध. गडचिरोलीत काम करतानाच महाराष्ट्राचे आरोग्य सचिव आम्हाला भेटले आणि म्हणाले, “”तुम्ही इतके बाहेर देशात जाऊन शिकून आलात. तुम्ही जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी स्वीकारावी,” असं आम्हाला वाटतं, दोन मंत्री आणि सचिव यांच्यासोबत चर्चा झाल्यावर त्यांनी जीआर काढला. त्यानुसार सर्चला शासकीय यंत्रणा सुधारण्याचे अधिकार मिळाले. आरोग्यसेवेसाठी रुग्णांची संख्या वाढू लागली. राणीच्या जबाबदारीखाली जिल्ह्यातलं पहिलं सिझरिन सेंटर सुरू झालं. ही वाट देखील तितकीशी सहज नव्हतीच. हळूहळू शासकीय व्यवस्थेचे काटे बोचायला लागले.
गडचिरोलीत माणसं मलेरिया आणि न्यूमोनियानं मरत होती आणि शासन मात्र कुटुंब नियोजनाच्या मागं होतं. जिथं विकास तिथं कुटुंब नियोजन, हे एक वेळ ठीक होतं. मात्र इथं परिस्थिती वेगळी होती. इथल्या लोकांच्या गरजा वेगळ्या होत्या, शासनाच्या योजना मात्र वेगळ्याच होत्या. दुसरी अडचण म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेला भ्रष्टाचार. मलेरियाचे अनेक रुग्ण रोज दाखल होत. एका रुग्णाला क्लोरोफिन गोळ्या हॉस्पिटलमधून देण्यात याव्यात, असं सांगितलेलं असतानाही त्या देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गोळ्या आणण्यासाठी त्या रुग्णाला आपला पाणी पिण्याचा तांब्या विकावा लागला. या घटनेची चौकशी केली असता लक्षात आलं, की महाराष्ट्र शासनाकडून क्लोरोफिन या गोळ्या आल्याच नव्हत्या. औषधाचं जे बजेट होतं त्यात आवश्यकता नसतानाही इरिथ्रोमायसिनचा साठा विकत घेण्यात आला होता. जवळपास 30 वर्षं पुरेल इतका साठा गडचिरोलीच्या माथी मारण्यात आला होता. तो परत पाठवून मी रोषास कारणीभूत ठरलो.
जिल्हा रुग्णालयातील अशा एकेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. एका सुताराकडून 50 रुपये लाच घेताना सिव्हिल सर्जनला पकडलं गेलं. कामं करायला सगळी खालची यंत्रणा असे. त्यांच्या बैठका घेतल्यावर अनेक गोष्टी नजरेत आल्या. पूर्ण यंत्रणाच भ्रष्टाचारानं पोखरलेली होती. हे सगळं बघताना आमची स्वप्नं डळमळीत होऊ लागली. आम्ही व्यवस्था बदलवू शकत नव्हतो. त्यातच काही घटना अशा घडल्या, ज्यात सिव्हिल सर्जनच्या बेधुंद कारभारामुळे काही रुग्णांना डोळ्यांचा त्रास झाला. दोषी असणाऱ्या व्यक्तींऐवजी आम्हालाच दोषी ठरवण्यात आलं. वर्तमानपत्रांनीही हेडलाइन्स छापल्या. विधानसभेत प्रश्र्न चर्चिला गेला. विधानसभेने चौकशी समिती नेमली. आम्हाला तुरुंगात टाकावं, अशीही मागणी झाली. अनेक मनस्तापांना तोंड द्यावं लागलं. मात्र अखेर आम्ही या सर्व आरोपांतून सहीसलामत सुटलो. वर्तमानपत्रांनीही माफी मागितली. आणि आमच्या लक्षात आलं, आपण यंत्रणा बदलायला गेलो तर बाकी सगळ्या यंत्रणा आपल्या विरोधात जातात. अखेर 1987 साली आम्ही जिल्हा रुग्णालयाच्या जबाबदारीचा राजीनामा दिला. 1977 ते 1987 हा दहा वर्षांचा कालावधी असा अपयश, विश्वासार्हता गमावणं अशा नाही नाही त्या गोष्टी सहन करण्यात गेला. एडिसनच्या उदाहरणाप्रमाणं या अपयशातून एवढंच कळालं, की 12 हजार पद्धतींनी दिवा चालत नाही. आम्ही हेही शिकलो आणि पुढच्या पावलांसाठी तयार झालो.
शोधग्रामची पाऊलवाट चालायला सुरुवात केली. गडचिरोलीतल्या अनुभवांनी आम्हाला बरंच काही शिकवलं. गडचिरोलीत एक कावीळ झालेली मुलगी रुग्ण म्हणून आली. तिचं रक्त तपासलं तर वेगळ्या आकारांच्या रक्तपेशी आढळल्या. (ज्यांना सिकल सेल म्हणतात) म्हणून गडचिरोलीत सिकल सेलसंदर्भात सर्व्हे केला. सर्वेक्षणात जे दिसलं ते आम्ही पालकमंत्र्यांशी बोलून जाहीर केलं. त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी आदिवासी आरोग्य रिसर्च सेंटर सुरू करू असं सांगितलं, जे पुण्यात बीजे मेडिकल कॉलेजला त्यांनी सुरूही केलं. आम्ही आदिवासींकडे गेलो. त्यांना या रोगाबद्दल कल्पना दिली. मात्र आदिवासी नेते म्हणाले, या रोगाचा आमचा काय संबंध? तुम्ही एक थेंब रक्त मागितलं, आम्ही दिलं. रोग तुमच्या डोक्यात आहे.
आपल्या डोक्याला बौद्धिक खाज असते म्हणून संशोधन करायचं नसतं. त्याचा उपयोग होत नाही. लोकांना वगळून तर नाहीच नाही, हे आम्हाला समजलं. आम्ही लोकांकडे जाऊन बसायला लागलो. आम्ही आदिवासींसाठी शिबिरं घेतली. त्यांच्याशी आरोग्याबाबत बोलत राहिलो. तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्हाला तुमच्या दवाखान्याची भीती वाटते, कारण तिथं देव नसतो. देव असेल तिथं आम्हाला आमच्या घरासारखं वाटतं. दवाखान्यातल्या नर्सच्या पांढऱ्या कपड्यांचीही त्यांना भीती वाटे. नातेवाईकांपासून तोडणारा दवाखाना जवळ करण्यापेक्षा आपल्या माणसांजवळ मरण आलेलं चांगलं, अशी त्यांची भावना होती. या आदिवासींना विश्वासात घेतलं तेव्हा त्यांच्या मनातल्या एकेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आणि शोधग्रामचा दवाखाना आकार घेऊ लागला. आता या दवाखान्याला नाव काय द्यायचं, हा प्रश्र्न समोर येताच त्यांच्याकडे उत्तरही तयारच होतं- “मॉं दंतेश्वरी दवाखाना.’ जरा वेगळं नाव बघू या का, असं सुचवताच त्यांच्याकडून ठाम नकार आला आणि उत्तर मिळालं, “”आता हा आमचा दवाखाना आहे, तुमचा नाही”. झोपडीसदृश्य दवाखाना करताना उदयगावच्या लेखागोडी गावच्या लोकांनी तर उत्साहानं येऊन झोपडीही बांधून टाकली. आणि बघता बघता झोपड्यांचं रुग्णालय उभं राहिलं. दंतेश्वरी!
एखादी गोष्ट आमची आहे, असं लोक म्हणतील अशाच गोष्टीच्या शोधात आम्ही होतो. 40 लोकांच्या सहभागानं हे उभं राहिलं. इथं वर्षातून एकदा जत्रा भरते. देवीची पूजा केली जाते. नृत्य, गाणी सादर होतात. आरोग्य संसदही भरते. लोकांसोबत काम करायचंं असेल, तर कोणताही प्रश्र्न सोडवण्याची सुरुवात त्यांच्यापासूनच करावी, हा धडा आम्ही शिकलो.
राणीला लोकांच्या मनात शिरून सगळं काढून घेण्याची कला अवगत आहे. इथं बायका सारख्या कानाफुसी करतात, हे तिच्या लक्षात आलं होतं. त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आलं, की त्यांना पदर जाणं, ही फार मोठ्या प्रमाणात घडणारी गोष्ट आहे. पदर जाणं म्हणजे पांढरं पाणी अंगावरून जाणं. बायका काय म्हणतात, त्यांच्या लैंगिक कल्पना काय आहेत, याविषयी राणीनं “कानोसा’ या पुस्तकात लिहिलं आहे. या पुस्तकाद्वारे बायांचं दडलेलं विश्व छापील स्वरूपात बाहेर आलं.
आम्ही दोन गावांत छोटासा अभ्यास केला. दोन गावांतल्या बायांना तपासलं. वसा आणि अमिरसा ही ती दोन गावं. गावानं अविश्वास वाटावा इतकं सहकार्य केलं. सहा महिने रोज 10 ते 15 केसेस मतदानाच्या केंद्राप्रमाणे तपासू लागलो. गावात जेवढ्या म्हणून बायका होत्या, त्यातील 92% बायांना स्त्रीरोग झाल्याचं आम्हाला आढळलं. वर्षानुवर्षं हा रोग पाळला जात होता. आम्ही यावरील पेपर अमेरिकेत पाठवला. 1989 मध्ये तो प्रकाशित झाला आणि अविकसित देशातल्या स्त्रियांमधल्या रोगांविषयीचा हा जगातला पहिला अभ्यास ठरला. आमच्या असं लक्षात आलं की, 85% लोकांनी कधीच उपचारही घेतला नव्हता, 55% मुलींचे लग्नाआधीच लैंगिक संबंध सुरू असलेले आढळले. जागतिक तज्ज्ञांनी हा पेपर म्हणजे महत्त्वाचं अध्ययन मानलं. रिप्रॉडक्टिव्ह हेल्थची स्त्रियांना गरज आहे, स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, ही महत्त्वाची भूमिका या अभ्यासानं जागतिक स्तरावर अभ्यासली गेली. लोक, सेवा आणि अध्ययन इथं एकत्र आलं आणि यातून या संशोधनाचं फलित साध्य झालं.
काम दुप्पट वेगानं सुरू झालं. गावोगावी जाऊन बायांना सांगण्यात आलं. सुईणींना प्रशिक्षित करण्यात आलं. नाच, गाणी, खेळ याद्वारे जागृती करण्यात आली. या प्रशिक्षित सुईणींचा दीक्षांत समारंभ थाटात करण्यात आला. डोक्यात ज्ञान, हृदयात प्रेम घेऊन या सुईणी बाहेर पडल्या. भारताच्या नॅशनल पॉलिसीतही बदल करण्यात आले.
2 ऑक्टोबरचा दिवस होता. त्या दिवशी सकाळी घराबाहेर बाजूलाच मोकळ्या मैदानात भटक्या लोकांचा पडाव होता. त्यांचा कलकलाट चालू होता. काय झालंय बघितलं असता त्यांच्यातला एक तंबू जळून खाक झाला होता. रात्री केव्हा तरी नवऱ्याने दारूच्या नशेत तंबूला आग लावून भांडण करून तो निघून गेला होता. तंबूसहित संसाराचं सगळं जळून खाक झालं होतं. आपल्या 13 मुलांना घेऊन एक बाई एकटी उभी होती. त्या बाईला आम्ही थोडीफार मदत केली; पण प्रश्र्न मिटलेला नव्हता. रात्री झोप येईना. खरं तर हा काही वैद्यकीय विषय नव्हता; पण मन अस्वस्थ झालं. गावातल्या बायांसोबत बोलू लागलो आणि एकेक करीत बाया सांगू लागल्या. खरा छळणारा रोग होता दारू! प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला दारूचा जणू शाप लागला होता. वैधव्याची आकांक्षा निर्माण करणारा असा हा रोग होता. एका सुईणीचा नवरा मेला. तिचं सांत्वन कसं करावं, या विचारात राणी असता ती सुईण मात्र आनंदानं म्हणाली, “”बरं झालं बाई तो मेला!” प्रत्येक घरात याहून वेगळी स्थिती नव्हती.
मग आम्ही या संदर्भात शोध सुरू केला. 7000 लोकसंख्या असलेलं बोधले गाव. 1988 साली इथं एक लक्ष रुपयांची दारू विकली जात होती. आम्ही एकूण 104 गावांचा अभ्यास केला. शासकीय आकडेवारीही मिळवली. गडचिरोलीत 20 कोटी रुपयांची दारू खपली जात होती. या जिल्ह्याचं विकासाचं बजेट होतं 14 कोटी रुपये! गडचिरोलीतील या आकडेवारीनं आम्हाला त्यांच्या गरिबीचं कारण कळालं. काहीतरी करायला हवं होतं. खरं तर केंद्र सरकारचे आदेश होते, की आदिवासी भागात दारूविक्रीचं लायसन्स द्यायचं नाही. पण केंद्र सरकारच्या नीतीविरुद्ध राज्य सरकार हे काम करीत होतं.
जिल्ह्यात सेल्फ मल्टिप्लाइंग प्रोसेस सुरू झाली. आम्ही परिषद घ्यायचं ठरवलं. परिषदेला फार तर 100 लोक येतील असंही वाटलं. आम्ही आमदार, कलेक्टर, एसपी, साऱ्यांना बोलावलं. कधी तोंड न उघडणाऱ्या बाया बोलू लागल्या होत्या. हिरेमण वरखेडेजींच्या नेतृत्वाखाली लोकांनी वर्गणी गोळा केली. सर्वपक्षीय दारूबंदी संघटना स्थापन झाली. आंदोलन झालं. लोकांनी आपआपल्या गावांत दारूबंदी केली. दारू पिणाऱ्या पुरुषांसाठी 150 गावांत कोंडवाडा तयार केला. 330 स्वयंसेवी संघटनांनीही आवाज उठवला आणि मागणी केली- दारू बंदी करा! दारूवर उत्पन्न मिळवून देणारा हा जिल्हा आपल्या हातातून जातो की काय, अशी भीती सरकारला वाटू लागली. सरकारनंही धास्ती घेतली. लोकांनी तर दिसेल ते दारूचं दुकान फोडायला सुरुवात केली. त्यामुळे हजारभर किलोमीटर दूर असलेल्या मुंबईला ऐकावं लागलं. पूर्ण जिल्ह्यातील 2200 वैयक्तिक दारूचे परवाने रद्द करण्यात आले. 60 दारूची दुकानं बंद झाली आणि 1993 साली गडचिरोलीत दारूबंदी लागू झाली. शासनानं कायदा केला- ज्या गावातील 51% बायका दारूबंदीची मागणी करतील, तिथं दारू बंद होईल. वर्ध्यात गांधी आणि विनोबा होते. गडचिरोलीत ना कोणी गांधी, ना कोणी विनोबा होते. पण त्यांच्या विचारांतून 6000 खेड्यांतले 6 लाख लोक एकत्र झाले आणि त्यांनी हा पराक्रम करून दाखवला. ज्ञान, संघटन, आंदोलन, परिवर्तन हे आपोआप घडत नसतं. लोक आले, शोधग्राम अस्तित्त्वात आलं. मोजमापाचं शास्त्र आलं, संघटन आलं, आंदोलन आलं. शोधग्राममध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरू झालं.
आपण सगळे मातीच्या पायांचे आहोत. एखादी समस्या हृदयाला भिडते आणि मनाचं द्वंद्व सुरू होतं- माझं घर सांभाळू की त्याचं घर उभं करू? गांधीजी म्हणत, लोकांशी नातं जुळवलं पाहिजे. ही फार मोठी ताकद आहे. आपली जीवनमूल्यं सार्वकालिक आहेत. ती आपल्याला ताकदच देतात. दक्षिण आफ्रिकेत 20-22 वर्षांचे गांधीजी पोट भरण्यासाठी गेले होते. कोणतंही उदात्त ध्येय घेऊन ते गेले नव्हते. मात्र त्यांनी तिथं जाऊन काय इतिहास घडवला हे आपण जाणतोच.
विचार करून पहा. प्रत्येकामध्ये एक छोटासा गांधी दडलेला असतो. प्रत्येक जण कामाला लागला तर खूप काही घडू शकतं.
No comments:
Post a Comment