Wednesday, June 6, 2012

ग्रेसच्या घरट्याचे स्मारक व्हावे - डॉ. अभय बंग


ग्रेसच्या घरट्याचे स्मारक व्हावे - डॉ. अभय बंग
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, March 28, 2012 AT 12:30 AM (IST)
नागपूर - "रत्नागिरीत केशवसुतांच्या राहुटीचे स्मारक झाले, तसे ग्रेस सरांच्या घरट्याचेही नागपूरकरांनी स्मारक करावे,' अशी अपेक्षा व्यक्त करीत ज्येष्ठ समाजसेवक आणि गडचिरोलीतील "शोधग्राम'चे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी ग्रेस यांना श्रद्धांजली अर्पण केली. ग्रेस यांच्या निधनाचे वृत्त कळताच डॉ. बंग पुण्याहून आज पहाटे नागपुरात आले आणि सकाळी साडेसहाच्या सुमारास पुष्पांजली देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. डॉ. अभय बंग यांनी ग्रेस सरांबद्दल व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत...

""कवी म्हणून ग्रेस अद्वितीय होते, हे अवघ्या महाराष्ट्राला माहितीये. मात्र, माणूस म्हणून ग्रेस मला वेगवेगळ्या रुपात भेटले. अगदी पहिल्यांदा मी विद्यार्थी असताना ग्रेसचे एका वर्तमानपत्राच्या पुरवणीत प्रकाशित झालेले पहिले-पहिले लेख मी वाचले आणि ही कोण ग्रेस व्यक्ती आहे, जी एवढे अद्‌भूत आणि सुंदर लिहीते, याचे कुतूहल मला वाटले. त्यानंतर खूपखूप वर्षांनी अचानक ते गडचिरोलीच्या जंगलात "शोधग्राम'ला येऊन दाखल झाले. दारूपासून त्यांना मोकळे व्हायचे होते. तब्येत चांगली नव्हती. मला म्हणाले, "डॉक्‍टर तुम्ही मला दारूपासून मुक्त करावे हा अपमान मला सहन होणार नाही. म्हणून तुम्ही मला फक्त आसरा द्या, मीच माझा उपचार करतो.' ग्रेस अतिशय प्रेमाने आमच्यासोबत दहा दिवस राहिले. रोज सकाळ-संध्याकाळ मी त्यांना जंगलात पायी फिरायला न्यायचो आणि त्यांच्या गप्पांचा धबधबा अंगावरती झेलायचो. ग्रेस सरांना जेव्हा नागपूरला परत पोचवायला मी स्वतः त्यांच्यासोबत गेलो, तेव्हा त्यांच्या घरात पहिल्यांदा पाऊल टाकले आणि ग्रेस हा माणूस एका गुहेमध्ये एकाकी राहणारा सन्यस्त कवी आहे, हे माझ्या लक्षात आले. त्यांचे घर, घराच्या सर्व भिंती या त्यांच्याच प्रतिबिंबांनी झाकलेल्या आहेत. इतका उघडपणे आत्ममग्न माणूस मी दुसरा पाहिलेला नाही आणि तरीही ग्रेसचे हे आत्ममग्न असणे एखाद्या लहान मुलासारखे निरागस होते. त्यात अजिबात लपवाछपवी नव्हती, सोंग नव्हते आणि ढोंगही नव्हते. त्यांचे हे आत्ममग्न असणे आणि त्यांच्या मनातील अपार दुःख या दोनमधूनच त्यांच्या कवितेचे अद्‌भूत विश्‍व त्यांनी निर्माण केले, अशी माझी समजूत आहे. नुकतीच एका महिन्यापूर्वी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांची भेट घेतली. तेव्हा ग्रेस म्हणाले होते, "डॉक्‍टर, एकदा मी व्यसनातून बाहेर पडलोय, एकदा कॅन्सरमधून आणि आतादेखील मी लढाई हारणार नाही. तुम्हाला वादा करतो की, लढाई जिंकून शोधग्राममध्ये भेटायला येईल.' कॅन्सरची लढाई बरेचवेळा आपल्या हातात नसते; पण ग्रेसने मरणदेखील शूरवीरासारखे अंगावर झेलले. त्यात त्यांचा आत्मसन्मान आणि विरक्ती दोन्हीही प्रकट झाली. आज सकाळी शेवटचे दर्शन घ्यायला घरी गेलो. त्यांच्या मुलींशी (डॉ. मैथिली, डॉ. माधवी) यांच्याशी बोललो. तेव्हा ग्रेस मला अजूनच जास्त समजले. "ग्रेसविना नागपूर आता सुनं झालंय', या प्रा. महेश एलकुंचवारांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. असा जिनीयस कवी पन्नास-शंभर वर्षांत एकदाच होतो. मला वाटतं, नागपूरकरांनी एक करावं, रत्नागिरीकरांनी केशवसुतांच्या जन्मगावी त्यांचे सुंदर स्मारक केलेय. त्याच धरतीवर ग्रेसचे राहते घर जसे आहे, त्या अवस्थेतच त्याचे सुंदर "ग्रेसफुल्ल म्युझीयम' करावे. पुढच्या पिढीला आणि नागपुरात येणाऱ्यांना गुहेत जाऊन त्या आदिम दुःख कवीचे, त्याच्या विविध रुपांचे आणि त्याच्या कविता कशा मनःस्थितीत निर्माण झालेल्या असतील याची झलक बघता येण्याची संभावना आहे. ते घर विस्कळित होण्यापूर्वी त्याला कायमस्वरूपी स्मारकाचे रूप देणे फार आवश्‍यक आहे. कालपासून माझ्या मनावर पूर्णपणे ग्रेसच्या जाण्याचे दुःख आणि त्यांच्या शब्दांचे आरूढ आहे. त्यातून बाहेर यावेसे वाटते आणि येऊ नये असेही वाटते.''

No comments:

Post a Comment